Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षांतर आणि फोडाफोडीचे वारे वाहत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये मोठा राजकीय भूकंप घडला असून, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह मनसे आणि काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश केला आहे. या घटनेने काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, महाविकास आघाडीच्या भविष्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तयारीत कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत सचिन पोटे, जान्हवी पोटे, मनसेचे माजी नगरसेवक कौस्तुभ देसाई, कस्तुरी देसाई यांच्यासह उबाठा गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा स्वीकारला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत महाविकास आघाडीचा टांगा पलटी झाला. आता महापालिका निवडणुकीत त्यांचे घोडेही फरार होतील.” ते पुढे म्हणाले की, आम्ही टीकेकडे लक्ष देत नाही; आरोपांना कामातून आणि टीकेला विकासातून उत्तर देतो.
सचिन पोटे यांचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, “सचिन हे लढवय्ये आणि प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या प्रवेशाने श्रीकांत शिंदे यांची टीम अधिक मजबूत झाली आहे. आधीच धोनी, विराट, रोहित होते; आता सचिनची एंट्री झाली.” महायुती महापालिका निवडणुकीत विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष असून, येथे कोणी मालक-नोकर नाही; पोटे यांचा योग्य सन्मान होईल, असे आश्वासनही दिले.
पक्षप्रवेशानंतर सचिन पोटे म्हणाले, “मी २५ वर्षे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले. आता शिवसेनेत अधिक उर्मीने काम करीन. हा निर्णय भावनिक होता, पण लोकांशी चर्चेनंतर शिवसेना निवडली. काँग्रेस नगरसेवक असतानाही श्रीकांत शिंदे यांनी विकासकामांसाठी मोठा निधी दिला.” याशिवाय जान्हवी पोटे, किशोर देसाई, विमल ठक्कर, शकील खान, आशा रसाळ, प्रवीण साळवे, फैजल जलाल, यतिन जावळे यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला. या घटनेने कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांत शिवसेना गटाला बळ मिळाले आहे.


