मुंबई: नवी मुंबईतील नेरुळ येथे अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी कोणतीही परवानगी न घेता अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यामुळे त्यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या विरोधात दाखल झालेली ही पहिलीच केस आहे. आता या प्रकरणावरून भाऊ तसचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आपल्या भावासाठी मैदानात उतरले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळचा शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून तयार असूनही अनावरण न करता कापडाने झाकून ठेवला होता. कौपरखैरणे येथे मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी आलेल्या अमित ठाकरे यांना ही बाब कळताच, त्यांनी मनसैनिकांसह तात्काळ पुतळ्याचे अनावरण केले. या वेळी मनसैनिक आणि पोलिसांत किरकोळ झटापटही झाली होती. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरे म्हणाले की, मी शाखा उद्घटनाच्या कार्यक्रमासाठी या भागात आलो होतो.मला असं कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा गेल्या चार महिन्यांपासून तयार आहे. त्यावर आता धूळ साचत आहे. हा पुतळा लोकांच्या मागणीवरून, लोकांसाठी झाला आहे. मात्र सरकारमधल्या कुठल्याही नेत्याला अथवा मंत्र्याला महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करायला वेळ मिळत नसल्याचे दिसतंय. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून हे स्मारक धूळ खात पडलं आहे. त्यावर धूळ जमतेय, मला ते बघवलं नाही. म्हणून मी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलं. या कृत्यासाठी माझ्यावर कारवाई होत असेल तर ही माझ्या आयुष्यातील पहिली केस असेल. मात्र वेळ आली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेवू, असे त्यांनी म्हटले होते.
अमित ठाकरेंसाठी आदित्य ठाकरे मैदानात
आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! चार महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमितने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं. महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? मोडून काढू ही दादागिरी, निवडणूक आयोग सरकारची, असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार प्रहार केलाय.


