Faltan Municipal Election: पुण्यासह राज्यभरात सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकांच्या प्रक्रियेत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. फलटण नगराध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या हालचालींमध्ये नाईक निंबाळकर घराण्यातील दोन गट आमनेसामने येण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. रामराजे राष्ट्रवादीत असतानाच त्यांच्या मुलाने शिवसेनेतून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने या लढतीत राजकीय रंग अधिकच गडद झाला आहे. अनिकेतराजे काही वेळात अधिकृतरीत्या आपला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा –इंदापूरमध्ये कृष्णा-भिमा स्थानिक विकास आघाडी स्थापन; वरिष्ठ नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर मोठा निर्णय
याउलट, भाजपनेही शेवटच्या क्षणी मोठा राजकीय डाव टाकत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मोठ्या भावाला, समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊन मुकाबला चुरशीचा केला आहे. सुरुवातीला दिलीपसिंह भोसले यांचे नाव चर्चेत होते, मात्र त्यांचा पत्ता कट करत भाजपने समशेरसिंह यांच्यावर विश्वास दाखवला. तेही लवकरच नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत.
फलटणमध्ये नाईक निंबाळकर कुटुंबातील दोन भाऊ व दोन वेगळे राजकीय प्रवाह यांच्यातील संघर्षाची पार्श्वभूमी नवीन नाही. काही दिवसांपूर्वी दोन्ही गटांमध्ये समेटाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्या फोल ठरल्या आणि पुन्हा एकदा ‘निंबाळकर विरुद्ध निंबाळकर’ अशी थेट लढत होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.


