पुणे : शहरातील गुन्हेगारीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीत. गेल्याच महिन्यात पुण्यात दोन जणांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर, आज पुन्हा एकदा पुण्याच्या सिंहगड कॉलेज परिसरातील एका इमारतीजवळ खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत युवकाला कोयत्याने आणि कुंड्याने मारहाण करत त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. मृत युवकाचे वय अंदाजे 20 वर्षांपेक्षाही कमी असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड कॉलेजकडे जाणार्या रस्त्यावरील मिनाक्षीपुरम येथील कृष्णकुंज इमारतीच्या पार्किंगमध्ये काही कारणावरून तरूणांमध्ये वाद झाला. तेव्हा 3 ते 4 जणांच्या समुह तेथे असल्याचे सांगितले जात आहे. आज सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तरुणावर कोयत्याने वार करुन तसेच दगड घालून त्याचा निर्घुण खुन केल्याचे समोर आले. तौफिर रफिक शेख वय 22 (रा. मक्का मशीद जवळ, कोंढावा) असे मृत तरुणाचे नाव आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सिंहगड रोड पोलीस घटनास्थळी पोहचले असून ते माहिती घेत आहेत.
तर,पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कृष्णकुंज इमारतीच्या पार्किंगमध्ये तौकीर शेख हा बसला होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास 3 ते 4 जण आले. त्यांनी कोयत्याने तौकीर शेख याच्यावर वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना त्याच्यावर दगड मारुन त्याचा निर्घुण खुन केला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.


