Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज दुपारी पुन्हा नवले ब्रिजवर अपघात झाला. गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण अपघातातील जखमा ताज्या असतानाच, नव्या अपघातामुळे सर्वांना धक्का बसला आहे. दुपारच्या सुमारास नवले पुलाच्या कुप्रसिद्ध आणि तीव्र उतारावर चार ते पाच वाहनांची टक्कर झाली. अचानक झालेल्या या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक विस्कळीत झाली.
प्राथमिक माहितीनुसार, या घटनात एक ते दोन जणांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने मोठ्या जीवितहानीची पुनरावृत्ती टळली असली, तरी वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा – नवले ब्रिज परिसरातील वाहतुकीत मोठे बदल; सततच्या अपघातानंतर प्रशासनाची कडक पावले
गेल्या आठवड्यात याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतर नवले पुलावरील वाहतूक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. प्रशासनाकडून उपाययोजनांबाबत आश्वासने देण्यात आली असतानाच, पुन्हा एकदा अपघात होणे हे चिंताजनक आहे.
आजच्या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, वाहनाचा वेग, उतारावरील नियंत्रण, आणि रस्त्यावरील तांत्रिक त्रुटी यांची शक्यता तपासली जात आहे. घटनास्थळी पोलीस आणि वाहतूक विभागाचे पथक पोहोचले असून, अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. वाढत्या दुर्घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


