Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुल परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी अपघातामुळे नव्हे तर प्रशासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे. काही दिवसांपूर्वीच या भागात झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले. गेली अनेक वर्षे हा परिसर अपघातांचा धोकादायक झोन म्हणून ओळखला जात असून स्थानिकांमध्ये सतत भीतीचं वातावरण आहे.
अपघातांच्या वाढत्या मालिकेनंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून नवले ब्रिज परिसरात मोठ्या बदलांची अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुलाचा तीव्र उतार आणि वेगवान वाहने ही अपघातांची मुख्य कारणे असल्याचे लक्षात घेत, या भागातील वेगमर्यादा 60 किमी प्रतितासवरून थेट 30 किमी प्रतितास इतकी कमी करण्यात आली आहे. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड गन्सचा वापर वाढवला जाणार असून नियम मोडणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई केली जाईल.
हेही वाचा – नवले पूल अपघातात 9 जणांचा मृत्यू; रोहित पवारांकडून शासनाकडे योग्य उपाययोजनांची मागणी
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून घेतलेल्या बैठकीत या उपाययोजनांना मंजुरी दिली. अवजड वाहनांसाठीही त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. पुढील काळात खेड-शिवापूर टोलनाक्यावर प्रत्येक वाहनाचे वजन तपासले जाईल. क्षमतेपेक्षा जास्त भार असलेल्या वाहनांना त्वरित दंड आकारला जाईल आणि ओव्हरलोड कमी करणे बंधनकारक राहील. टोलनाक्यावरच दंडाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने नियम मोडणाऱ्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही.
याशिवाय, नवले पुलावर अपघात रोखण्यासाठी विशेष चेकपोस्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे अवजड वाहनांची तपासणी, ड्रिंक अँड ड्राईव्ह चाचण्या, तसेच इतर सुरक्षाविषयक तपासण्या सातत्याने सुरू राहतील. चालकांना सावध करणे व वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी प्रत्येक 100 मीटरवर सूचना फलक बसवले जाणार आहेत. या सर्व कडक उपाययोजनांनंतर नवले पुलावरील अपघातांची मालिका थांबणार का, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. तथापि, स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने उचललेले हे पाऊल अत्यंत आवश्यक व योग्य दिशेने टाकलेले मानले जात आहे.


