हडपसर (पुणे) : मांजरी हद्दीतील गोपाळपट्टी परिसरात रविवारी (ता. १६) रात्री साडेआठ वाजता पुणे-दौंड डेमू रेल्वेने दिलेल्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी पाच मित्र रेल्वे रुळावर एकत्र असल्याचे समोर आले असून, इतर दोघे घाबरून पळून गेले. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, रुळावरुन चालताना अंधार आणि रेल्वेचा वेग हे प्रमुख कारण असल्याची माहिती मिळत आहे.
प्रथमेश नितीन तिंडे (वय 18, रा. काळेपडळ, हडपसर), तन्मय महेंद्र तुपे (वय 18,रा. विशाल कॉलनी, ढेरे बंगला, गोपाळपट्टी) व तुषार शिंदे (वय 19, रा. गोपाळपट्टी, हडपसर) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून दौंडकडे निघालेली डेमू रेल्वे भरधाव वेगाने जात असताना हे पाच मित्र रुळावर एकत्र होते. रात्रीच्या वेळी अंधार आणि रेल्वेच्या हॉर्नकडे दुर्लक्ष यामुळे तिघांना धडक बसली. अपघातानंतर उरलेले दोघे मित्र घाबरून घटनास्थळ सोडून निघून गेले. अपघाताची माहिती मिळताच हडपसर आणि लोहमार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा पूर्ण करून तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले.
हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (Accidental Death) नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. रेल्वे पोलिस आणि हडपसर पोलिस संयुक्तरीत्या अपघाताच्या कारणांचा शोध घेत आहेत. रुळ ओलांडण्यासाठी अधिकृत मार्ग न वापरणे आणि रात्रीच्या वेळी रुळावर फिरणे हे धोकादायक असल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरातील नागरिकांनी रेल्वे रुळांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. या अपघातामुळे गोपाळपट्टी आणि हडपसर परिसरात दुःखाची लाट पसरली आहे.


