मुंबई : कल्याणमधील शिवसेना कार्यालयाबाहेर एक धक्कादायक घटना घडली आहे. एकनाथ शिंदे गटाचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी मध्यरात्री हल्ला केला आहे. एका भांडणात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेत असताना, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हल्लेखोरांनी बोरगावकर यांच्या गाडीवर मोठे दगड फेकून हल्ला केला. यामुळे गाडीच्या काचा पूर्णपणे फुटल्या, आणि आतील सीटवर काचांचा खच पडला.
या हल्ल्यात बोरगावकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते ज्ञानेश्वर सपाट आणि ओंकार सपाट हेही गंभीर जखमी झाले. सध्या सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, परंतु हल्लेखोरांनी तत्पूर्वी पळ काढला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हल्ल्यामागील कारण, जुन्या वादाशी संबंध किंवा राजकीय कनेक्शन आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
बोरगावकर आणि इतर जखमींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.या हल्ल्याने कल्याणमध्ये खळबळ उडाली असून, शिवसेना कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. महात्मा फुले पोलिसांनी विशेष पथक नेमून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे.


