Palghar : पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यात शनिवारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेदरम्यान आयोजित मॅरेथॉन शर्यतीत तृतीय क्रमांक पटकावलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीचा काही वेळातच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
तलासरी तालुक्यातील वेवजी सोरठपाडा येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (३ जानेवारी) मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उंबरगाव येथील १५ वर्षीय रोशनी गोस्वामी या विद्यार्थिनीने मोठ्या जिद्दीने धावत तिसरा क्रमांक मिळवला.
मात्र शर्यत पूर्ण केल्यानंतर रोशनीला अचानक प्रचंड धाप लागली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ती मैदानावरच खाली बसली आणि काही क्षणांत बेशुद्ध पडली. शाळा प्रशासनाने तिला तातडीने जवळच्या गुजरातमधील उंबरगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
शर्यतीनंतर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळेच मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे उंबरगाव आणि तलासरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
या क्रीडा स्पर्धेसाठी घोलवड पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. घटनेनंतर घोलवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


