मुंबई : मोंथा चक्रीवादळाने लँडफॉल केल्यानंतरही महाराष्ट्रातील अवकाळी पावसाचा कहर थांबण्याचं नाव घेत नाहीये. हवामान तज्ज्ञ डॉ. सुप्रित यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व मध्य अरबी समुद्र, पूर्व विदर्भ, दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. यामुळे हवामानात झपाट्याने बदल होत असून, राज्याच्या अनेक भागांत पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे.
विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात ३१ ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात जोरदार पावसाची नोंद झाली आहे, यामध्ये मालवण, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस पडला. वादळी वाऱ्यांसह झालेल्या या पावसाने शेतातील उभी पिके उद्ध्वस्त झाली असून, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
विदर्भावर कमी दाबाचा पट्टा; गुजरातकडून डीप डिप्रेशनचा धोका
डॉ. सुप्रित यांच्या मते, मोंथा चक्रीवादळ लँडफॉलनंतर कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले असून, त्याचा थेट परिणाम विदर्भाच्या काही भागांवर दिसत आहे. याशिवाय, सायक्लोनिक सर्क्युलेशनही तयार झाले आहे. दुसरीकडे, गुजरातच्या दिशेने येणारे डीप डिप्रेशन वादळी वारे आणखी तीव्र करत आहे. पुढील ३६ तास महाराष्ट्र आणि गुजरातसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, दोन्ही राज्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान उत्तरेकडील भागांत पुन्हा सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी, पुढील ४८ तास राज्यात पावसाळे वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
३ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम कायम
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ३१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाचा इशारा कायम आहे. तळ कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसणार आहे. मुंबईत पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून, तळ कोकणात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
३ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी होईल, तरीही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.


