मुंबई : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून आता सर्वांचे लक्ष महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 22 जानेवारी रोजी महापौर पदाचे आरक्षण जाहीर होणार असून, कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गातून महापौर निवडला जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजप महायुतीला स्पष्ट वर्चस्व मिळाले असून, जवळपास 24 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबई महापालिकेतील महापौरपद कोणत्या पक्षाकडे जाणार, हे पूर्णपणे आरक्षण सोडतीवर अवलंबून आहे.
मुंबईत आरक्षण सोडतीमुळे मोठी उलथापालथ शक्य
मुंबई महापालिकेत जर एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गासाठी महापौरपद राखीव झाले, तर राजकीय गणित पूर्णपणे बदलू शकते. कारण मुंबईतील एसटी प्रवर्गातील दोन्ही जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर भाजप आणि शिंदे गटाकडे एकही एसटी प्रवर्गातील नगरसेवक नाही. त्यामुळे ही आरक्षण सोडत अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
अशी होणार महापौर पदाची आरक्षण सोडत
मागील सुमारे 20 वर्षांतील आरक्षणाचा इतिहास विचारात घेतला जातो.
संबंधित महापालिकेत यापूर्वी जे आरक्षण लागू झाले होते, ते वगळले जाते.
उर्वरित प्रवर्गांच्या चिठ्ठ्या तयार केल्या जातात.
आरक्षणाचे प्रवर्ग : एससी, एसटी, ओबीसी आणि खुला वर्ग, तसेच त्यात 50 टक्के महिला आरक्षण.
सर्व चिठ्ठ्या उपस्थितांसमोर दाखवून पारदर्शक बॉक्समध्ये टाकल्या जातात.
त्यातून एक चिठ्ठी काढून मुख्य आरक्षण निश्चित केले जाते.
त्यानंतर स्वतंत्रपणे महिला आरक्षणाची चिठ्ठी काढली जाते.
ही संपूर्ण प्रक्रिया 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात पार पडणार आहे.
मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल
भाजप – 89
शिवसेना ठाकरे गट – 65
शिवसेना – 29
काँग्रेस – 24
मनसे – 6
एमआयएम- 8
एनसीपी – 3
एसपी – 2
एनसीपी शप – 1
————–
एकूण- 227


