Khopoli murder case black car attackers : रायगड जिल्ह्यातील खोपोलीत मोठी खळबळ उडाली आहे. खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे (शिंदे गट, शिवसेना) यांचे पती मंगेश काळोखे यांची शुक्रवारी (२६ डिसेंबर) सकाळी सुमारे ७ वाजता अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण हत्या केली. मंगेश काळोखे हे नेहमीप्रमाणे मुलांना शाळेत सोडून घरी परत येत असताना त्यांच्या गाडीला काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या ३-४ हल्लेखोरांनी अडवले आणि त्यांच्यावर हल्ला चढवला.
प्रत्यक्षदर्शींनुसार, हल्लेखोर आणि मंगेश यांच्यात काही वाद झाल्यानंतर हल्लेखोरांनी सपासप वार केले. जखमी अवस्थेत मंगेश यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
चार दिवसांपूर्वीच (२१ डिसेंबर) झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत मानसी काळोखे नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. घरात आनंदाचे वातावरण असतानाच ही घटना घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय वादातून किंवा इतर कारणातून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
खोपोली पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून, शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पोलिस राजकीय कोनातूनही तपास करत आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे खोपोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


