मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या मे महिन्याच्या वेतनाकरिता राज्य सरकारने एप्रिल महिन्याचे सवलत मूल्याचे ३७४ कोटी ०९ लाख १९ हजार ७९२ इतकी रक्कम रोखीने प्रदान करण्यास बुधवार, ४ जून रोजी मान्यता दिल्याचे परिपत्रक राज्य सरकारने प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन वेळेत होणार आहे.
एसटी महामंडळात २५० आगारांत तब्बल ८७ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन ठरल्याप्रमाणे ७ तारखेला मिळणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन उशिराने मिळत असल्याने मोठ्या आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागत होते. अशातच परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन ७ तारखेलाच होईल, असे आश्वासित केले होते. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असेही सरनाईक यांनी सांगितले. त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन वेळेत होण्यासाठी राज्य सरकारने सवलत मूल्याचे ३७४ कोटी ०९ लाख १९ हजार ७९२ इतकी रक्कम रोखीने प्रदान करण्यास मान्यता दिली आहे.


