मुंबई : राज्यामध्ये तुकडे बंदी कायद्याची सुधारणा करा, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही सुधारणेचे पुढचे पाऊल टाकत आहोत. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर महसूल खात्यामध्ये जवळपास महत्त्वाचे १७ ते १८ निर्णय घेतले आहेत.
आता रहिवासी क्षेत्रामध्ये एक गुंठा जमिनीचा तुकडा पाडता येईल, असा कायदा आम्ही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आणत आहोत, असे महसूल मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या भेटीसाठी मंत्री बावनकुळे हे सोमवारी दिल्ली दौऱ्यावर होते. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एनटीपीसी प्रकल्पात कुंभारी गावाचे पुनर्वसन व्हावे. शेत जमिनीचे संपादन ज्या पद्धतीने केले, त्याच पद्धतीने घरांचे झाले पाहिजे, यासंदर्भात खट्टर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीत पोहोचले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. बावनकुळे म्हणाले, राज्यामध्ये तुकडे बंदी कायद्याची सुधारणा करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर महसूल खात्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अधिवेशनात ‘एक राज्य, एक नोंदी’, ‘व्हर्टिकल स्वामित्व’ देण्याबाबत प्रयत्न करणार आहोत.
मोदी सरकारच्या काळात महिलांचे सक्षमीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी जे उपक्रम सुरू केले आहेत, ते स्वतंत्र भारताच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाले नव्हते. महिलांचे सक्षमीकरण मोदींच्या काळात जेवढे होत आहे, तितके पूर्वी कधीही झाले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत महिलांना प्राधान्य दिले, असे मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कारकीर्दीबाबत बावनकुळे म्हणाले.


