मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आमदार व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात गंभीर आरोप करत तब्बल आठ इच्छुक उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नार्वेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणल्यामुळे उमेदवारी अर्ज स्वीकारले गेले नाहीत, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील एक नव्हे तर तीन सदस्य महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मंगळवारी ही याचिका सुनावणीसाठी आली. मात्र, न्यायालयाने या प्रकरणावर तातडीची सुनावणी घेण्यास नकार देत योग्य वेळी सुनावणी होईल, असे स्पष्ट केले.
बबन महाडिक, नीरज राठोड, वैशाली गावडे, मेहबूब हुसेन मद्दनवार, परिचय भोईर, मनोज मोरे, रबसाना अहमद शफिक शेख आणि मार्गरेट जी. कोस्टा या आठ उमेदवारांनी ॲड. आशीष गायकवाड यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे.
याचिकेत म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 224 ते 227 साठी आवश्यक कागदपत्रे आणि अनामत रक्कम सादर करूनही राहुल नार्वेकर यांच्या दबावामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारले नाहीत. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर न्यायालयात धाव घ्यावी लागल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेच्या निवडणुका येत्या 15 जानेवारी रोजी होणार असून, संबंधित उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकाऱ्यांना देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
कुटुंबीयांसाठी अधिकारांचा गैरवापराचा आरोप
कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 मधून अनुक्रमे राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर, भाऊ मकरंद नार्वेकर आणि बहीण गौरी नार्वेकर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळेच राजकीय सत्ता आणि घटनात्मक पदाचा गैरवापर करून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
तसेच उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून बाहेर काढण्यासाठी पोलिस यंत्रणेवर दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे. घटनात्मक पदावर असताना राहुल नार्वेकर हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान निवडणूक कार्यालयात का उपस्थित होते, असा प्रश्नही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.
‘आप’ची ठाम भूमिका
दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्याविरोधात कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही, असे काही माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचे आम आदमी पक्षाने तीव्र शब्दांत खंडन केले आहे. निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याप्रकरणी ‘आप’ने पालिका आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे तिसरी अधिकृत तक्रार दाखल केल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
जनता दल (एस) ने आपली तक्रार मागे घेतली असली, तरी आम आदमी पक्षाने कोणतीही तक्रार मागे घेतलेली नसल्याचा ठाम दावा ‘आप’कडून करण्यात आला आहे.


