Palghar News : राज्य सरकार कितीही मातृ-बालसंगोपनाच्या योजना राबवत असलं तरी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा असंवेदनशील चेहरा पुन्हा उघडा पडला आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील ताणसा अभयारण्य परिसरात एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका चालकाने गावापासून पूर्ण दोन किलोमीटर आधीच रस्त्यावर उतरवून निघून गेल्याची संतापजनक घटना घडली.
मोखाडा तालुक्यातील आमला (ता. मोखाडा) गावाची सविता बांबरे (वय २४) या महिलेची १९ नोव्हेंबरला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. गुंतागुंतीमुळे त्यांना जव्हार उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांची सुखरूप प्रसूती झाली. २३ नोव्हेंबरला (रविवार) डिस्चार्ज मिळाल्यानंतर १०२ रुग्णवाहिकेने त्यांना घरी पाठवले.
मात्र रुग्णवाहिका चालकाने केवळ सुर्यमाळ फाट्यापर्यंतच आणले आणि “पुढे रस्ता खराब आहे” असे सांगून सविता यांना दोन दिवसांच्या नवजात बाळासह, आई आणि सासूबाईंसह रस्त्यावर उतरवले. घनदाट जंगलातून आणि डोंगराळ भागातून त्यांना दोन किलोमीटर पायपीट करत घरी पोहोचावे लागले.
या प्रसंगाचा व्हिडीओ स्थानिक राजू सोमा बारात यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर तो व्हायरल झाला आणि संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. आदिवासी भागातील नागरिकांनी “आम्हाला असेच जगायचे आणि मरायचे का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
चालकाने दिले स्पष्टीकरण
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब चत्तर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका केवळ केवनाळे गावापर्यंत बुक झाली होती. आमला गावाकडे जाण्याचा आग्रह महिलांनी धरला असता चालकाने सुर्यमाळ फाट्यापर्यंत आणले. तिथे महिलांनी “आम्ही पुढे पायी जाऊ” असे सांगितल्यामुळे चालक परतला, असा बचाव चालकाने केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असून, संबंधित चालक आणि रुग्णवाहिका व्यवस्थापनावर कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. पण आदिवासी भागात अशा घटना वारंवार घडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर विश्वास उरलेला नसल्याची भावना व्यक्त होत आहे.


