Weather Forecast : देशात सध्या हिवाळ्याची चाहूल लागली असून, उत्तर भारतात थंडीची लाट आणि दाट धुक्याने वाहतूक व जनजीवन प्रभावित झाले आहे. हवामान विभागाने (IMD) १७ डिसेंबर २०२५ साठी पाच राज्यांत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचवेळी उत्तरेकडील अनेक भागांत सकाळी व संध्याकाळी दाट धुक्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्रात मात्र पाऊस नाही, फक्त गारठा आणि थंडीचा जोर वाढला आहे.
कोणत्या ५ राज्यांत पावसाचा इशारा?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज जम्मू-काश्मीर, तमिळनाडू, पुदुचेरी, केरळ आणि अंदमान-निकोबार बेटांवर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार हवेची शक्यता आहे. अंदमान-निकोबारमध्ये ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहू शकतात.
दाट धुक्याचा इशारा कोणत्या भागांत?
उत्तर भारतात थंडी आणि धुक्याने कहर माजवला आहे. आज सकाळी व संध्याकाळी दाट ते अतिदाट धुक्याची शक्यता आहे, ज्यामुळे वाहतूक आणि विमानसेवेवर परिणाम होऊ शकतो. मुख्यतः पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि ईशान्य भारतातील भागांत धुके पडेल. बिहार, उत्तर प्रदेशातील पाटणा, लखनऊ, प्रयागराज, कानपूर, गुरुग्राम, शिमला आदी शहरांत धुक्याचा प्रभाव जास्त असेल. वाहनचालकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील स्थिती काय?
महाराष्ट्रात थंडीची लाट कायम असून, किमान तापमानात घट झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारवा वाढला आहे. पहाटे कडाक्याची थंडी जाणवत असून, ग्रामीण भागांत हुडहुडी भरली आहे. राज्यात पावसाची शक्यता नाही, मात्र पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहील.
राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान (अंदाजे)
अहिल्यानगर: ८.५, पुणे: ९.४, जळगाव: ८.५, कोल्हापूर: १५.१, महाबळेश्वर: १२.१, मालेगाव: ९.२, नाशिक: ८.८, सांगली: १४.८, सातारा: १३.५, सोलापूर: १४.९, छत्रपती संभाजीनगर: १०.९, परभणी: ११.३, अकोला: ११.०, अमरावती: ११.३, बुलढाणा: १२.३, गोंदिया: ८.५, नागपूर: ९.६, वर्धा: १०.८, यवतमाळ: १०


