मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, महाविकास आघाडीने सर्वपक्षीय शिष्टमंडळाची घोषणा केली आहे. या शिष्टमंडळाने १४ ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार असून, विशेष म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत.
ही माहिती शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले असून, ही भेट ‘लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न’ असल्याचे राऊत म्हणाले.
या सर्वपक्षीय शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (ठाकरे गट) चे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समावेश आहे. ही बैठक १४ ऑक्टोबरला दुपारी १२:३० वाजता होणार असून, यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सर्व नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल. राऊत यांनी सांगितले की, ही भेट निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्थेशी संवाद साधण्यासाठी आहे, यात प्रत्येक पक्षाच्या समस्या मांडल्या जातील.
काय म्हणाले संजय राऊत?
पत्रकार परिषदेत राऊत यांनी स्पष्ट केले, “राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आणि राज ठाकरे हे सर्व प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. निवडणूक आयोग हे संवैधानिक पद आहे आणि राज्याच्या निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. भाजपला देखील समस्या आहेत, त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले आहे. महायुतीतील दोन्ही पक्षांना (शिंदे गट आणि अजित पवार गट) पत्र पाठवले आहे.” राऊत यांनी ही भेट ‘राजकारण नव्हे, तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न’ असल्याचे सांगितले.
संजय राऊत यांची एक्स पोस्ट
एक्सवर राऊत यांनी ही घोषणा करत लिहिले, “निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता आहे. तरीही लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवायला हवा. १४ ऑक्टोबर १२.३० वाजता राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आणि राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हावे, अशी विनंती. हे राजकारण नाही तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आहे. भेटीनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सर्व नेत्यांची पत्रकार परिषद होईल.”


