मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या अजस्त्र प्रचारयंत्रणेला निष्प्रभ करण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून तब्बल 40 जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली असून, प्रचाराची विशेष जबाबदारी आदेश बांदेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
या यादीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, माजी मंत्री अनिल परब, भास्कर जाधव, सुषमा अंधारे, वरुण सरदेसाई, अंबादास दानवे, अनिल देसाई, विनायक राऊत, आनंद दुबे यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकीत हे सर्व नेते राज्यभरात प्रचाराच्या मैदानात उतरून मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना प्रचारात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे 40 स्टार प्रचारक
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शुभाष देसाई, संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब, राजन विचारे, सुनील प्रभू, आदेश बांदेकर, वरुण सरदेसाई, अंबादास दानवे, रवींद्र मिरलेकर, नितीन पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, लक्ष्मण वाढले, मनोज जामसुतकर, नितीन देशमुख, सुषमा अंधारे, संजय जाधव, ज्योती ठाकरे, जयश्री शेळके, जान्हवी सावंत, शरद कोळी, ओमराजे निंबाळकर, सुनील शिंदे, हारुन खान, सिद्धार्थ खरात, वैभव नाईक, आनंद दुबे, अशोक तिवारी, राम साळगावकर, प्रियांका जोशी आणि अनिश गाढवे.
दरम्यान, मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा विक्रोळी येथे होणार आहे. आगामी काळात दोन्ही नेत्यांच्या सात ते आठ संयुक्त सभा नियोजित असून, शिवसेना आणि मनसेच्या शाखांना देखील उद्धव व राज ठाकरे एकत्रितपणे भेटी देणार आहेत. याशिवाय, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेही मुंबईत दोन संयुक्त सभा घेणार असल्याने निवडणूक प्रचार अधिकच रंगणार आहे.


