Sushma Andhare : शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी विधानपरिषदेच्या हक्कभंग समितीसमोर कारवाई सुरू आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाला सुरुवात झाली होती.
मागील काही महिन्यांपासून अंधारे आणि कामरा हे दोघेही समितीसमोर हजेरी लावत आहेत. दरम्यान, हक्कभंग समितीची पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे अंधारे या सुनावणीसाठी उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या अनुपस्थितीबाबत विधिमंडळाला अधिकृत पत्र पाठवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.


