मुंबई : महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपती बाप्पाला आज अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. मुंबईत आज तब्बल 6,500 सार्वजनिक गणेश मंडळे आणि सुमारे दीड लाख गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका (Ganesh Visarjan 2025) रस्त्यावर उतरणार आहेत. या भव्य सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चोख बंदोबस्त ठेवला आहे. विसर्जन मार्गावर 10,000 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 25,000 पोलीस कर्मचारी तैनात असतील, तर मुंबई महानगरपालिकेचे 10,000 कर्मचारीही या सोहळ्याच्या व्यवस्थेसाठी सज्ज आहेत.
पावसाची हजेरी, उत्साहात रंग भरणार
यंदा गणपती विसर्जनाला पावसाची (Mumbai Rain) साथ मिळणार आहे. कालपासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली असून, आज पहाटेपासूनही सततच्या सरी कोसळत आहेत. काळ्या ढगांनी आकाश व्यापल्याने पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शनिवारी दक्षिण मुंबईत रिमझिम पाऊस, तर उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. शुक्रवारीप्रमाणेच आजही पावसाचे वातावरण कायम राहील, तर सोमवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
पावसामुळे विसर्जन मिरवणुकीत नाचणाऱ्या भक्तांचा उत्साह दुप्पट होणार आहे. मात्र, सततच्या पावसामुळे गणेशमूर्ती झाकून न्याव्या लागतील आणि मिरवणुकीचा वेगही मंदावण्याची शक्यता आहे. तरीही, बाप्पाच्या निरोपाच्या या भावनिक क्षणांना पावसाची रिमझिम साथ एक वेगळाच रंग देणार आहे.
लालबागच्या राजासह मानाच्या गणपतींचा निरोप
मुंबईतील गणेशगल्लीचा गणपती, अर्थात ‘मुंबईचा राजा’, सर्वप्रथम विसर्जनासाठी मार्गस्थ होईल. त्यानंतर लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, अंधेरीचा राजा आणि लालबाग व परळ परिसरातील इतर मानाचे गणपती मंडपातून विसर्जनासाठी निघतील. यापैकी लालबागच्या राजाची मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरेल. ही भव्य मिरवणूक शनिवारी दिवसभर आणि रात्रभर मुंबईच्या रस्त्यांवरून फिरत रविवारी सकाळी गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी पोहोचेल.
पावसातही भक्तांचा उत्साह अखंड
पावसाची शक्यता असली तरी गणपती भक्तांचा उत्साह कायम आहे. मुंबईकर बाप्पाला निरोप देताना पावसाच्या सरींसह नाचत, गात आणि भक्तीभावाने दंग होणार आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पावसाचा जोर कायम राहील, पण सोमवारनंतर हवामान स्वच्छ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या गणपती विसर्जनाचा सोहळा पावसाच्या सरींसह अविस्मरणीय ठरणार आहे.


