मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण चौथ्या दिवसात प्रवेश करत आहे. २९ ऑगस्ट २०२५ रोजी लाखो मराठा आंदोलकांसह जरांगे मुंबईत दाखल झाले, त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी आणि गोंधळाचं वातावरण आहे. आज, १ सप्टेंबर २०२५ रोजी काही मराठा आंदोलकांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) इमारतीबाहेर घोषणाबाजी केली आणि आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, यामुळे तणाव निर्माण झाला.
BSE बाहेर आंदोलकांचा गोंधळ
सकाळपासून सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे. काही आंदोलकांनी BSE इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवलं. यावेळी आंदोलकांनी “आम्हीही शेअर होल्डर आहोत, आम्हाला शेअर मार्केटचं कार्यालय बघण्याचा अधिकार आहे. आमचे पैसे यात गुंतवले आहेत. आमच्या आंदोलनामुळे मार्केटवर परिणाम होऊ शकतो, म्हणून आम्ही स्थिती जाणून घेण्यासाठी आलो,” असं ठणकावलं. यानंतर आंदोलकांनी BSE परिसरात “एक मराठा, लाख मराठा” अशा घोषणा देत जोरदार निदर्शनं केली. या घटनेमुळे दक्षिण मुंबईतील वातावरण आणखी तणावपूर्ण झालं आहे.
जरांगेंचा पोलिसांवर गंभीर आरोप
मनोज जरांगे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. “४०-५० पोलीस भगवे रुमाल आणि टोप्या घालून आंदोलकांमध्ये शिरले आहेत. ते आमच्या गाड्या माघारी पाठवत असून, जरांगे यांनी परत जायला सांगितलं, असं खोटं सांगत आहेत,” असं जरांगे म्हणाले. या पोलिसांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, “आम्ही गावात परत गेलो, तर तुमच्या आमदार-खासदारांना राज्यात फिरू देणार नाही. त्यांची अवस्था वाईट होईल,” असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
महाराष्ट्रभरातून आंदोलकांना मदत
आझाद मैदानातील आंदोलकांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मदत येत आहे. शेतकरी बांधवांकडून भाकरी, चपात्या, तांदूळ, गहू, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे, मसाले आणि लोणच्यांसह जीवनावश्यक वस्तूंचा ओघ सुरू आहे. आंदोलनाचे दिवस वाढत असल्याने उपासमार होऊ नये, यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतून मदत पाठवली जात आहे. मात्र, पावसामुळे आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे आंदोलकांना व्हायरल ताप, चिखल्या आणि त्वचा विकार यांसारख्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.


