मुंबई : शिवसेना (शिंदे गट) चे राज्य समन्वयक खासदार नरेश मस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे यांना पुणे शिक्षक आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणीची जबाबदारी सोपवत नियुक्तीपत्र जारी केले आहे. या नियुक्तीमुळे चिवटे यांच्या उमेदवारीची शक्यता वाढली असून, महायुतीत जागा वाटपाच्या चर्चांना नवे वळण मिळाले आहे. ही निवडणूक डिसेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता असली तरी, चिवटे यांनी गेल्या वर्षापासून तयारीला सुरुवात केली आहे.
खासदार नरेश मस्के यांनी जारी केलेल्या नियुक्तीपत्रानुसार, पुणे शिक्षक मतदार नोंदणी प्रमुखपदी मंगेश चिवटे यांची तर मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी प्रमुखपदी राजेंद्र जंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिंदे आणि चांदगुडे यांच्या उपस्थितीत चिवटे यांना सुपूर्द करण्यात आली.
पुणे विभागातील सुमारे ७२,९४५ शिक्षक मतदार असलेल्या या संघातून शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून, चिवटे यांच्या नेतृत्वात मतदार नोंदणी मोहीम राबवली जात आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूर येथे एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने मेळावे घेतले गेल्याने, गेल्या महिन्यापासून शिवसेना कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतेच चिवटे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही मागणी केली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत
आणि सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी जाहीर भाषणांत चिवटे यांना शिवसेनेकडून पुणे शिक्षक मतदारसंघ सोडण्याची मागणी केली असून, पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपकडे जाण्याची सूचना केली आहे.
महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे असली तरी महायुतीत सध्या भाजपकडे आहे. मात्र, शिंदे सेनेने या मतदारसंघावर दावा सांगत अंतर्गत चुरस निर्माण केली आहे. चिवटे यांची वाढती सक्रियता पाहता, त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.


