मुंबई: पवार कुटुंबातील तरुण नेते युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या हाय-प्रोफाईल विवाह सोहळ्याला राज्याच्या राजकारणातील अनेक दिग्गज नेतेमंडळींनी हजेरी लावली, विशेषतः पवार कुटुंबातील प्रमुख सदस्य या निमित्ताने एकत्र आले होते. लग्नाच्या वरातीत पवार कुटुंबीयांनी जोरदार डान्स केला. त्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती
पवार कुटुंबातील तरुण नेते युगेंद्र पवार यांच्या लग्नाच्या निमित्ताने शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्ती एकाच वेळी उपस्थित होत्या. त्याशिवाय, इतर राजकीय पक्षातील नेत्यांनीही उपस्थिती लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री हजर होत्या.मुंबईतील जिओ सेंटरमध्ये विवहैसोहळा पार पडला.
सुप्रिया सुळे यांचा उत्स्फूर्त सहभाग
खासदार सुप्रिया सुळे यांनी लग्नाच्या कार्यक्रमात तुफान डान्स केला, ज्यामुळे सोहळ्याची रंगत आणखी वाढली आणि एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सुप्रिया सुळे यांनी निळ्या रंगाची साडी नेसली होती.पारंपारिक वाद्यांच्या तालावर सगळ्यांनी ठेका धरला होता. सुनेत्रा पवार यांनी खास लाल रंगाची, मोठ्या काढाची पैठणी नेसली होती.
अजित पवारांची गैरहजेरी
एकीकडे संपूर्ण कुटुंब विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असताना, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. अजित पवार युगेंद्र पवारांच्या विवाह सोहळ्यावेळी उपस्थित राहणार नाव्हते अशी माहिती समोर आली आहे.
राजकीय वर्तुळात या दोन्ही गटातील संबंधांवर सातत्याने चर्चा होत असताना, अजित पवारांची ही गैरहजेरी लक्ष वेधणारी ठरली आहे. पवार कुटुंबातील या कौटुंबिक सोहळ्याला राजकीय रंगाची किनार लाभल्याने, उपस्थितांमध्ये सुप्रिया सुळेंच्या डान्सची आणि अजित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा अधिक होती.
सकाळी 10 वाजता अजित पवार भोर येथील सभेसह आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर दौंड, इंदापूर, माळेगाव आणि बारामती या ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या. बारामतीतील सभा सायंकाळी साडेसहाला पार पडल्या. युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा सायंकाळी 5.15 पार पडला आहे.


