मुंबई : राज्यातील सर्व प्रकारच्या 394 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नोंदणीकृत नसल्याचे समोर आले आहे. यापैकी बहुतांश शाळा ग्रामीण भागातील असून, सुमारे आठ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अवघी दहाच्या आत आहे. ग्रामीण भागातील शाळा रिकाम्या होण्याचे हे वाढते प्रमाण शिक्षण व्यवस्थेतील चिंताजनक परिस्थिती दर्शवते. ‘यूडायस-प्लस’च्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या नोंदणी आकडेवारीने शिक्षण क्षेत्रातील गंभीर वास्तव उघड केले आहे.
राज्यातील एकूण विद्यार्थी नोंदणीचा आकडा 2 कोटी 11 लाख 86 हजार 943 इतका आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत सात हजारांनी अधिक आहे. ही वाढ सकारात्मक असली, तरी पाच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. यामुळे येत्या काळात विद्यार्थीसंख्या लाखोंनी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, ग्रामीण भागातील शाळांमधील रिक्तपणा आणि कमी पटसंख्या यामुळे शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने अधिक गंभीर बनली आहेत.
ग्रामीण भागातील शाळा रिकाम्या होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की स्थलांतर, शहरीकरण, खासगी शाळांबद्दल वाढता कल आणि शिक्षण सुविधांचा अभाव. या समस्येवर वेळीच उपाययोजना न केल्यास ग्रामीण शिक्षणाचा पाया आणखी कमकुवत होण्याची भीती आहे. शासन आणि संबंधित यंत्रणांनी याकडे तातडीने लक्ष देऊन ग्रामीण शाळांना पुनरुज्जन देण्याची गरज आहे, जेणेकरून प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षणाचा हक्क मिळेल.
ग्रामीण भागांत स्थिती गंभीर
‘यूडायस-प्लस’वरील नोंदणीनंतर मिळालेल्या आकडेवारीनुसार, पुण्यात सर्वाधिक ३७ शाळांत एकाही विद्यार्थ्याची नोंद झालेली नाही. रत्नागिरीतील २४, नागपूरमधील २३ शाळाही विद्यार्थ्यांविना आहेत. बुलढाण्यात २१ शाळांत शून्य पटसंख्या आहे. या आकडेवारीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ७१३ शाळांची पटसंख्या दहाच्या खाली आहे. पुण्यात ६२७, रायगडमध्ये ६८२, तर सिंधुदुर्गमध्ये ५६९ शाळांत एवढीच मोजकी विद्यार्थीसंख्या आहे.
मुंबई उपनगरांतील ३६०, मुंबई शहरातील ३४, ठाण्यातील १९९ आणि पालघरमधील १२४ शाळांतही विद्यार्थ्यांची संख्या दहाच्या खालीच आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी २०० ते ३००, तर काही ठिकाणी १०० ते १५० शाळा अशा श्रेणीत आहेत. राज्यात एकूण सात हजार ९४६ शाळांत केवळ १ ते दहा विद्यार्थी नोंदले गेले आहेत.
शहरनिहाय शाळा
मुंबई शहर – ५
मुंबई उपनगर – २२
ठाणे – १५
पालघर – १९
रायगड – १२
जिल्हानिहाय शाळा
पुणे – ३७
रत्नागिरी – २४
बुलढाणा – २१
छत्रपती संभाजीनगर – १५


