Nashik Accident : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एरंडगावजवळील रायते शिवारात भयंकर रस्ता अपघात झाला. गुजरातमधील सुरत येथून साई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे निघालेल्या सात भक्तांच्या फॉर्च्युनर गाडीवर चालकाचे नियंत्रण सुटले आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. अपघात इतका भीषण होता की गाडीने दोन-तीन पलट्या मारल्या. यात तीन भक्तांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी आहेत. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरत येथील हे कुटुंब साई बाबांच्या दर्शनासाठी फॉर्च्युनर गाडीने निघाले होते. नाशिक-शिर्डी महामार्गावर एरंडगाव परिसरात पोहोचताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. गाडीने अचानक पलट्या मारत बाजूला जाऊन धडक दिली. या घटनेत दोन भक्त जागीच ठार झाले, तर रुग्णालयात दाखल करताना एकाच मृत्यू झाला.
बाकीचे चार जखमींना तात्काळ नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती अजूनही गंभीर असून, ते आयसीयूत आहेत. अपघाताची माहिती मिळताच येवला पोलिस स्टेशनचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आणि रस्ता वाहतूक पोलिस घटनास्थळी धावले. मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, मृतकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे आणि ते गुजरातमधील सुरतचे रहिवासी असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समजते. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी वाहनाची तपासणी, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबानी घेतल्या जात आहेत. चालकाची जबाबदारी आणि वाहनाची अवस्था यांचा तपास सुरू असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


