शिर्डी: देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डीत वर्षभर मोठ्या संख्येने देश-विदेशातील साईभक्त दर्शनासाठी येतात; मात्र या प्रवासादरम्यान अनेकदा भाविकांना छोटे-मोठे अपघात होतात. या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थानने मोठा निर्णय घेतला असून, अपघातग्रस्त साईभक्तांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचे घोषित करण्यात आले आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही माहिती दिली.
शिर्डीच्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्रात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हा विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे; मात्र यासाठी भाविकांनी साईबाबा संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर दर्शनासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. घरातून निघाल्यानंतर मंदिरात दर्शन घेईपर्यंत काही अप्रिय घटना घडल्यास, त्या भाविकाला किंवा त्याच्या कुटुंबीयांना पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळेल.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले की, जो साईभक्त बाबांच्या दर्शनासाठी येईल, त्याच्यासाठी पाच लाख रुपयांचा विमा उतरवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे; मात्र भाविकांनी दर्शनाला निघण्यापूर्वी संस्थानच्या ऑनलाईन वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.


