Nashik Leopard Attack: नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याची दहशत निर्माण झाली आहे. पुण्यानंतर आता नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे गावात बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय सुदाम जुंदरे या तरुणाचा मृत्यू झाला. पहाटे सुमारास गावाजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत त्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले असून हल्लेखोर बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी त्यांनी वन विभागाकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वाढता संचार दिसत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिन्नर आणि देवळाली भागातही मागील काही महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे तीन जणांचा बळी गेला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून वन विभागाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, रात्रीच्या वेळी बिबट्या गावाच्या सीमेजवळील डोंगराळ भागात आणि शेतीजवळ फिरताना दिसत आहे. ग्रामस्थांनी वन विभागाला अनेक वेळा कळवले असतानाही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत, अशीही तक्रार आहे.
सध्या वन विभागाने पिंजरा लावून शोधमोहीम सुरू केली असून, परिसरात अतिरिक्त पथके तैनात करण्यात आली आहेत. परंतु ग्रामस्थांचा आक्रोश वाढत असून ते जोपर्यंत बिबट्याला पकडले जात नाही, तोपर्यंत गाव शांत बसणार नाही असा इशारा देत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आलं होतं. त्या बिबट्याने तीन जणांचा बळी घेतल्याने संतापाचा उद्रेक झाला होता. ड्रोन आणि शार्प शूटरच्या मदतीने ती मोहीम यशस्वी पार पडली होती.


