Maharashtra Politics : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ईशान्य भारतातील मेघालयात २०१३ मध्ये लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांनी स्थापन केलेला नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) आता महाराष्ट्रात एन्ट्री करत आहे. हा पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी मतभेदांनंतर तयार झाला असून, आदिवासी आणि स्थानिक समाजाच्या हक्कांसाठी काम करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
२०२३ मध्ये मेघालय विधानसभा निवडणुकीत NPP सर्वात मोठा पक्ष ठरला आणि त्याला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली. मेघालयसह मणिपूर, नागालँड, झारखंड, आसाम या राज्यांत पक्षाचा दबदबा आहे. सध्याही मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हे NPP चे आहेत. पक्षाने NDA सोबत काही राज्यांत युती केली आहे. आता हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होत आहे.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अमित वेळूकर यांची नियुक्ती
दिल्लीत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी अमित वेळूकर यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. वेळूकर सध्या बुलढाणा दौऱ्यावर आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांत NPP आदिवासीबहुल भागात उमेदवार उभे करणार आहे. पक्षाच्या विस्तार, धोरण आणि कामगिरीची जबाबदारी वेळूकर यांच्यावर असणार आहे.
४ नोव्हेंबरला राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा झाली. २ डिसेंबरला मतदान होऊन ३ डिसेंबरला निकाल जाहीर होईल. ४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू आहे. या वातावरणात NPP ची एंट्री झाली असून, जनता या पक्षाला किती संधी देईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


