पुणे : विद्यार्थ्यांना जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकवण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १०२ शिक्षकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १ सप्टेंबरपासून या प्रशिक्षणाच्या ऑनलाईन वर्गांना सुरुवात होणार आहे. हे शिक्षक प्रशिक्षणानंतर सर्वच विद्यार्थ्यांना या भाषेचे ज्ञान देणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे.
शिक्षकांसाठी १८० तासांचा हा ऑनलाईन प्रशिक्षणक्रम असून यामध्ये शब्दसंपत्ती, उच्चार, काळ यांसारखे दोन्ही भाषांचे मूलभूत ज्ञान दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर परीक्षेच्या आधारे प्रमाणपत्र दिले जाईल. शाळा सुटल्यावर हे ऑनलाईन वर्ग घेतले जाणार असून, प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना मराठी-ते-जर्मन व फ्रेंच भाषांतील अनुवाद असणाऱ्या व्हिडिओसह पेनड्राइव्हही दिला जाणार आहे.
प्रारंभी जिल्ह्यातील ३०३ शाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून निवडल्या जातील. त्यानंतर टप्याटप्याने इतर शाळांमध्येही हा उपक्रम राबविला जाणार आहे. शाळांमध्ये आठवड्यातून एक दिवस, एका तासासाठी हा अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.
बहुभाषिक शिक्षणाचा धरला जातोय आग्रह
नवीन शैक्षणिक धोरणानुसार बहुभाषिक शिक्षणाचा आग्रह धरला जात असून, हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे. पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामध्ये २५ टक्के रक्कम शिक्षकांनी स्वतः भरायची असून, उर्वरित शुल्क जिल्हा परिषद भरणार आहे. मोफत प्रशिक्षण घेतल्यास त्याला गांभीर्य राहत नाही. त्यामुळे शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी नमूद केले आहे.


