करंदी: पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातील सर्व 14 गावांमधील बैलगाडा शौकीनांच्या आग्रहाखातर करंदी शिवजयंती उत्सव समिती व करंदी बैलगाडा संघटनेच्या पुढाकाराने माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांच्यासाठी तीन दिवशीय बैलगाडा शर्यतींना आज सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी पावसाचे सावट असतानाही 151 बैलगाडे आज करंदीच्या घाटात धावले. यात घाटाचा राजा ठरलेल्या वेदश्री गणेश सुक्रे (केंदूर) यांच्या गाड्याने 10.91 मिलीसेकंदाच्या वेळेत आपला गाडा पळवून आजचा घाटाचा राजा सन्मान पटकावला तर आरव अग्निक मांजरे (मांजरेवाडी) याने 11.10 मिली सेकंदाच्या वेळेत आपला गाडा निशानापर्यंत पोहचविल्याने त्याने दूसरा क्रमांक पटकावला.
पावसाचे सावट असतानाही 151 बैलगाडे धावले
संपूर्ण राज्यभरात पावसाने अजुनही उघडीप दिली नसतानाही करंदी ग्रामस्थांच्या आग्रहाने माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांच्यासाठीची बैलगाडा शर्यत आज शनिवारी (दि. 01) सकाळी नऊच्या दरम्यान सुरू झाली. पहिल्याच दिवशी करंदीतील ग्रामस्थांनी, बैलगाडा शौकीनांनी मोठा प्रतिसाद देत शर्यतीचे उद्घाटन केले. ढगाळ वातावरणात सुरू झालेल्या आजच्या स्पर्धेदरम्यान काही वेळा पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, तरीही बैलगाडा शौकीन आणि मालक मंडळींनी घाटात पाय रोवून स्पर्धा पार पाडल्या. आजच्या दिवसात एकुण 170 टोकन बैलगाड्यांना पळविण्याचे आयोजकांचे नियोजन होते. मात्र संध्याकाळी पाचच्या सुमारास पाऊस चांगल्याच आल्याने 151 बैलगाडे पळाल्यानंतर आजच्या स्पर्धा थांबविण्यात आल्या.
पाच अनौंसरांच्या चुमुमुळे स्पर्धा जोरात रंगली
बैलगाडा शर्यती रंगतात त्या चांगल्या आणि फर्ड्या अनौंसरांच्या निवेदनामुळे. करंदीतील आजच्या घाटाची सुरुवात दौलत प-हाड व संतोष ढोकले यांनी केली. त्यांच्या साथीला माऊली मुळे, आण्णा जाधव आणि प्रविण सावंत यांनी आपल्या धमाकेदार अनौंसिंगमुळे आजची स्पर्धा प्रचंड रंगली. रंगतदार सादरीकरण, प्रत्येक गाड्याची खुलासेवार माहिती, बैलगाडा मालकांचे तोंडभरुन कौतुक आणि चांगल्या पळालेल्या बैलगाड्यांसाठी कौतुकाची थाप असे सगळेच रंगतदार चित्र आजच्या करंदीच्या घाटात दिसून आले. विशेष म्हणजे संपूर्ण दिवसभर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातून प्रमुख इच्छुक असलेले वढु बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले जातीने उपस्थित होते.
537 सहभागी गाडे, 15 गाडे फायनलमध्ये, 6000 शौकीनांची उपस्थिती
पहिल्या दिवशीच्या खेळात पळालेल्या एकुण 151 गाड्यांपैकी 15 गाडे फायनलला गेले आहेत. स्पर्धा या पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटातील पाबळ, केंदूर, धामारी, मुखई, हिवरे, खैरेनगर, खैरवाडी, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, करंदी, वाजेवाडी, पिंपळे-जगताप, वढु बुद्रुक, आपटी या केवळ 14च गावांमधील बैलगाड्यांसाठी असतानाही सर्व गावांतून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि एकुण 537 टोकन आजच्या स्पर्धेत नोंदले गेले. पहिल्या दिवशीच्या स्पर्धेत 151 बैलगाडे पळाले तर पुढील दोन दिवसांच्या स्पर्धेत उर्वरित 386 बैलगाडे पळण्याचे नियोजन आयोजकांनी केले आहे. दरम्यान आजच स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तब्बल 6 हजार बैलगाडा शौकीन घाटात आनंद घेत असल्याचे चित्र मोठे कौतुकाचे होते.


