पुणे : जिल्हा परिषदेच्या दक्षिण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याच्या प्रकरणानंतर जिल्हा परिषदेमध्ये सर्व टेंडर कारकुनांसह तब्बल २५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचे आदेशामध्ये म्हटले आहे. जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
दक्षिण बांधकाम विभागामध्ये लाचखोरीमुळे तत्कालीन कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि एका कनिष्ठ अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर निलंबित करण्यात आले. त्यानंतर लगेचच एका लेखाधिकाऱ्याची बदली करण्यात आली. मात्र याचवेळी दक्षिण आणि उत्तर बांधकाम विभागातील टेंडर कारकून, काही ऑडीटर्स बिलींगची जबाबदारी असणाऱ्या कर्मचारी यांच्याबाबत तक्रारी होत्या.
मार्च अखेर असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाईची प्रक्रिया थोडी लांबणीवर टाकण्यात आली. मात्र, तब्बल २५ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बजावण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मोठा धाडसी निर्णय घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या नियमित बदल्या मे महिन्यामध्ये केल्या जातात, यावेळी कारवाईचा तिसरा टप्पा असणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या बदल्यांबाबतची अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना नव्हती.
बदल्यांची कारवाई ही गोपनीय ठेवण्यात आली. पाकिटे सबंधित विभागाच्या खातेप्रमुखांकडे देण्यात आली. याबाबतची चर्चा संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये झाली. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र आता अर्थविभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी होणार याचाबतची उत्युकता जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरु आहे. याबाबत प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.


