पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या टोळीविरोधात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 6 हजार 455 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या दोषारोपपत्रात गणेश विसर्जनाच्या दिवशी कोथरूड परिसरात गोळीबार घडवून आणण्याचा कट रचल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात टोळीतील नऊ गुन्हेगारांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
या प्रकरणातील आरोपींमध्ये मयूर ऊर्फ राकेश कुंबरे, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, गणेश राऊत, दिनेश फाटक, आनंद चांदलेकर, मुसाब शेख, जयेश वाघ, अक्षय गोगावले आणि अजय सरोदे यांचा समावेश आहे. सर्व आरोपी कोथरूड आणि परिसरातील रहिवासी आहेत.
9 आरोपी अटकेत, 8 फरार
गोळीबार प्रकरणाच्या तपासात आरोपींकडून वापरलेले एक पिस्टल आणि एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे. तसेच नीलेश घायवळ याच्या घरझडतीदरम्यान दोन जिवंत काडतुसे आणि चार रिकाम्या पुंगळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी आठ जण फरार आहेत. न्यायालयाने या फरार आरोपींना फरार घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कट
पोलीस तपासात उघड झाले आहे की, कोथरूड परिसरात टोळीची दहशत कमी झाल्याने नीलेश घायवळ याने पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी हा कट रचला. हमराज चौक आणि शास्त्रीनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी शस्त्रे व पैसे पुरवण्याचे आश्वासन देत, गुन्हा दाखल झाल्यास सर्व जबाबदारी स्वतः घेईन, असे सांगून त्याने साथीदारांना चिथावणी दिली होती.
हा कट 6 सप्टेंबर 2025 रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी रचण्यात आला. त्यानुसार 17 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मुठेश्वर मित्रमंडळ चौकाजवळ गप्पा मारत उभ्या असलेल्या नागरिकांवर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.
मोक्काअंतर्गत कारवाई
या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलिसांनी आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. तपासादरम्यान 122 साक्षीदार तपासले गेले असून, त्यापैकी सहा साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले आहेत.
बेकायदा इमारतींचा तपास सुरू
दरम्यान, नीलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ यांनी कोथरूड परिसरात उभारलेल्या दोन बेकायदेशीर इमारतींचाही तपास सुरू आहे. या इमारतींवर कारवाई व्हावी यासाठी पुणे महापालिकेकडे पोलिसांकडून पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.


