Pune Crime: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, ‘खाकी’ला पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा कलंक लागला आहे.
नेमकं प्रकरण काय?
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करंजेपुल चौकीमार्फत सुरू होता. तिथे कार्यरत असलेला हवालदार रमेश लक्ष्मण नागटिळक (वय ४२) याने संबंधित आरोपीला न्यायालयात लवकर जामीन मिळवून देण्यासाठी आणि दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल करताना सवलत देण्यासाठी लाचेची मागणी केली होती.
दरम्यान, सुरुवातीला ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून नागटिळक याला ही रक्कम स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले. तक्रारदार महिलेने १८ जानेवारी रोजी याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. विशेष म्हणजे, या चौकशीत संबंधित उपनिरीक्षकाचा सहभाग आढळला नसल्याने केवळ हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि त्यांच्या पथकाने केली.


