पुणे : पुण्यात वाढत चाललेल्या गुंडगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. एका मराठी ब्लॅक अॅण्ड व्हाईट या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, पुण्यातील गुंडगिरीला कोणताही एक पक्ष नाही, तर सर्वच राजकीय पक्ष जबाबदार आहेत.
यावेळी शरद पवारांसोबतची युती, भाजपसोबतचे राजकीय आरोप-प्रत्यारोप, तसेच पुण्यातील गुंडगिरी आणि विविध घोटाळ्यांवर चर्चा झाली. पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होताच अजित पवारांनी थेट विषयाला हात घातला.
कोयता गँगसारख्या गुन्हेगारी टोळ्यांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “यावर बोलायला अनेकजण दबकत आहेत. निवडणुकीत यश मिळवण्यासाठी काही राजकीय पक्षांनी अशा प्रवृत्तींना खतपाणी घातलं. ही परिस्थिती आजची नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात तयार होत गेली आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी एका पक्षाचा आहे म्हणून सगळी जबाबदारी माझ्यावर नाही. पुण्यात आठ-दहा पक्ष सक्रिय असतील, तर सगळ्यांनी मिळूनच गुंडगिरीवर नियंत्रण आणावं लागेल.” अजित पवारांच्या या स्पष्ट वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळात त्यावर चर्चा रंगली आहे.


