Ajit Pawar : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये जागावाटपाची चर्चा तीव्र झाली होती. मात्र, २६ डिसेंबर रोजी ही चर्चा फिसकटल्याची माहिती समोर आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून कुणालाही न सांगता, नेहमीचा पोलीस ताफा आणि सुरक्षारक्षक न घेता अचानक बाहेर पडले. त्यांचे वाहन पुण्यातील जिजाई निवासस्थानी आढळले, मात्र तिथे कर्मचाऱ्यांनी अजित पवार उपस्थित आहेत की नाही, याबाबत माहिती देण्यास नकार दिला.
या घटनेमुळे पुणे आणि बारामतीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार ‘नॉट रिचेबल’ झाल्याची चर्चा रंगली असून, ते नेमके कुठे गेले याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मागील काही दिवसांपासून अजित पवार बारामती हॉस्टेलमध्ये महापालिका निवडणुकीच्या जागावाटप आणि तिकीटवाटपावर मॅरेथॉन बैठका घेत होते. शरद पवार गटाच्या नेत्यांशीही बंद दाराआड चर्चा झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाने शरद पवार गटाला फक्त ३५ जागा देण्याची ऑफर दिली, त्याही ‘घड्याळ’ चिन्हावर लढण्याच्या अटीसह. ही ऑफर शरद पवार गटाने नाकारली आणि चर्चा थांबली. यानंतर अजित पवारांचे अचानक निघून जाणे याला जोडले जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांचे असे ‘अचानक गायब’ होणे नवे नाही. यापूर्वीही अनेकदा राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी असा स्टंट केला आहे. मात्र, सध्या तरी त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पुणे महापालिकेत १६५ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, दोन्ही राष्ट्रवादी गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस आणि उबाठा सेना एकत्र येण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह पुन्हा समोर आला आहे. पुढील काही तासांत अजित पवार कुठून प्रकट होतात आणि काय निर्णय जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


