पुणे : नाना पेठ परिसरात ५ सप्टेंबर २०२५ च्या रात्री घडलेल्या टोळीयुद्धाने पुण्याला हादरवले. अवघ्या १९ वर्षांच्या आयुष गोविंद कोमकर (१९) याची निर्घृण हत्या झाली, जी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या १ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या खुनाचा बदला म्हणून रचण्यात आली. आयुष हा वनराजचा भाचा आणि आंदेकर टोळीचा नातू असला, तरी त्याचा गुन्हेगारी जगताशी काहीही संबंध नव्हता.
तरीही सूडभावनेने आंदेकर टोळीने त्याला लक्ष्य केले. घटनास्थळावर ‘टपका रे टपका, एक और टपका’ हे गाणे स्पीकरवर वाजवून हल्लेखोरांनी दहशत माजवली. या हत्येचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेला आयुषचा लहान भाऊ अर्णव कोमकर (१०) याने पहिल्यांदाच एका वृत्तसंस्थेशी बोलत थरारक क्षण सांगितले. अर्णवच्या वर्णनातून हत्येचा नियोजित कट आणि पोलिस-रुग्णवाहिकेच्या उशीराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आयुषने त्या दिवशी अर्णवला क्लासमधून घरी आणायला गेला होता. क्लास सोडल्यानंतर आयुष डॉक्टरकडे गेला आणि फोन करून हार आणि प्रसाद आणण्याबाबत विचारले. त्याने फक्त हार घेतला आणि अर्णवला घेण्यासाठी परत आला. दोघे लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये पोहोचले. आयुष गाडी लावत असताना दोन हल्लेखोर अमन पठाण आणि यश पाटील पळत आले. त्यांच्या मागे दोन जण थांबलेले होते. आयुष वळताच फायरिंग सुरू झाली. जवळपास १२ गोळ्या झाडल्या गेल्या, त्यापैकी ९ गोळ्या थेट शरीरात घुसल्या.
अर्णवने सांगितले, “पहिल्या दोन गोळ्या लागताच भाऊ जमिनीवर कोसळला. मी गोंधळलो. त्या वेळी सोसायटीत कोणीच नव्हते. आम्ही ज्या रोडवरून आलो होतो, तिथे मागे-पुढे कोणी नव्हते. दोन पोरं पळत आली आणि फायरिंग केली. गोळ्या लागताच भाऊ खाली पडले. मी ओरडलो, पण काहीच उपयोग झाला नाही.” अर्णवने सांगितले की, घटनास्थळावर ‘टपका रे टपका’ हे गाणे आंदेकर चौकात येताना वाजत होते, पण हत्येच्या ठिकाणी नव्हते.
अर्णवच्या मते, सोसायटीतील एक डॉक्टर आयुषला तपासत होता, पण खूप रक्त सांडत होते. डॉक्टर म्हणाले, “पोलीस केस आहे, पोलिसांना सांगा आणि रुग्णवाहिका बोलवा.” पोलिसांना यायला कमीतकमी अर्धा तास लागला, तर रुग्णवाहिकेला ४५ ते ५० मिनिटे लागली. “तोवर आयुष जागीच पडलेला होता. प्रयत्न करत होते, पण उपयोग झाला नाही.
गोळ्या लागताच तो बोलू शकला नाही, पण शेवटी त्याने म्हटलं, ‘इथे फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडू अण्णा आंदेकर चालणार, बाकी कोण नाही. जो आमच्या नादी लागणार, त्याचं असंच होणार’,” असे अर्णवने सांगितले. या शब्दांनी आयुषच्या अंतिम क्षणांचा आक्रोश व्यक्त होतो. घरात तेव्हा आई आणि मोठी बहीण होत्या. पोलिस आणि रुग्णवाहिका पोहोचल्यानंतर आयुषचा मृतदेह हलवला गेला. पोस्टमॉर्टममध्ये ९ गोळ्या शरीरात सापडल्या, आणि त्याचा मृत्यू जागीच झाल्याचे निष्पन्न झाले.


