Baramati plane crash : पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान अपघाताची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. गोजुबावी परिसरात सरावासाठी उड्डाण केलेले शिकाऊ विमान अचानक कोसळल्याची घटना समोर आली असून सुदैवाने या अपघातात दोन्ही शिकाऊ वैमानिक सुरक्षित बचावले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रेडबर्ड कंपनीचे हे प्रशिक्षण विमान नियमित सरावासाठी उड्डाण करत होते. मात्र उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने विमान गोजुबावी परिसरातील शेतात कोसळले. विमान कोसळताच मोठा आवाज झाल्याने स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावले आणि मदतकार्य सुरू केले.
या अपघातात विमानाचे किरकोळ नुकसान झाले असून वैमानिकांनी प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, प्रशासन आणि संबंधित प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, ज्या गोजुबावी परिसरात हा अपघात झाला, त्याच भागात काही काळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानालाही अपघात झाला होता. त्यामुळे या परिसरातील तांत्रिक आणि भौगोलिक परिस्थितीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
बारामतीमध्ये अनेक वैमानिक प्रशिक्षण संस्था कार्यरत असून प्रशिक्षण उड्डाणांची संख्या मोठी आहे. गेल्या काही महिन्यांत या परिसरात विमान अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


