Rupali Thombre Patil: मतमोजणी केंद्रावर गोंधळ करून शासकीय कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह अन्य काही उमेदवार व प्रतिनिधींवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रिय
कार्यालयाचे उप अभियंते सुधीर आलुरकर (५२) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी महापालिका मतदानाची मतमोजणी असताना दुपारी बाराच्या सुमारास रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांच्याकडील हरकत अर्जाची पोहोच द्यावी. म्हणून मतदान मोजणी केंद्राच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उभारलेल्या सुरक्षा जाळीवर चढून आरडाओरड करून निवडणूक प्रक्रियेत व शासकीय कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला. तसेच त्यांच्यासोबतअन्य इतर काही उमेदवार व प्रतिनिधींनी देखील आरडा ओरड करून गोंधळ करून निवडणूक प्रक्रियेत व शासकीय कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याने रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तेली या करत आहेत.


