मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची धावपळ वाढली असून, राज्य निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. वेळापत्रकाची अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर येथील युवक-युवती मेळाव्यात संभाव्य तारखा जाहीर करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
त्यांच्या मते, ५ नोव्हेंबर (बुधवार) रोजी निवडणुकीची घोषणा होईल आणि त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू होईल. प्रथम नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडतील, त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितींसाठी १५ डिसेंबरला मतदान होईल. जिल्हा परिषद निवडणुका सुरू असताना महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होईल आणि १५ जानेवारीला महापालिका मतदान होईल. सर्व निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
“मी तारीख जाहीर करत नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. पण माझ्या माहितीनुसार असे वेळापत्रक असेल,” असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसारही पुढील आठवड्यात (५ किंवा ६ नोव्हेंबर) घोषणा होण्याची शक्यता आहे, तर सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आता महायुती किंवा महाविकास आघाडीची वाट न पाहाता भेटीगाठी व दौऱ्यांसह प्रचाराला सुरुवात केली असून, वळसे पाटील यांच्या वक्तव्याने त्यांना नवीन चालना मिळाली आहे.
महायुतीत स्वबळावर लढण्याचा संकल्प
महायुतीतील पक्ष (भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना) स्वबळावर लढणार की एकत्र येणार, याबाबत चर्चा सुरू असली तरी मुंबई महानगरपालिकेसाठी युती होण्याची शक्यता आहे. इतरत्र स्थानिक समीकरणानुसार निर्णय घेतले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांसाठी स्पष्ट केले की, “भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद एकत्र आली तर महाविकास आघाडीचा फायदा होईल. त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढू.” स्थानिक पातळीवर नेत्यांना युतीचा निर्णय घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव-शिरूर मेळाव्यात वळसे पाटील यांनी हे मुद्दे उपस्थित करताना इच्छुकांना मार्गदर्शन केले.


