लोणावळा : लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी आमदार सुनील शेळके (राष्ट्रवादी- अजित पवार गट) यांच्यावर थेट नाव न घेता अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासमोरच त्यांनी केलेलं हे वक्तव्य आता प्रचंड व्हायरल होत आहे.
सुरेखा जाधव म्हणाल्या, “कमळाशिवाय दुसरा पर्यायच नाही. गल्ली ते दिल्ली सगळीकडे भाजप आहे. इथला आमदार आपला नसला तरी त्याचा बाप आपला आहे… मुख्यमंत्री आपला आहे! त्यामुळे सगळीकडे कमळ फुलवा!” असं त्या म्हणाल्या.
या “त्याचा बाप” या उल्लेखाने थेट अजित पवार यांच्याकडे बोट दाखवल्याचा अर्थ काढला जात आहे. चित्रा वाघ यांच्या उपस्थितीतच हे वक्तव्य झाल्याने भाजपमध्येच मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दरम्यान, यापूर्वी आमदार सुनील शेळके यांनीही सुरेखा जाधव यांच्यावर एकेरी उल्लेख करून टीका केल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी “बाप-बेटा” शब्दयुद्ध आता निवडणुकीत नवा ट्विस्ट आणत आहे.
लोणावळा निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असला, तरी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या काही उमेदवारांनीच राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उघड पाठिंबा दिल्याने पक्षांतर्गत बंडखोरीही उघड झाली आहे.


