Farmer Loan Waiver Maharashtra : कोपरगाव कोळपेवाडी येथे कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाचा प्रारंभ कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाला. या वेळी आमदार आशुतोष काळे यांनी आयोजित शेतकरी मेळाव्यात भरणे यांनी कर्जमाफीचा मुद्दा हाताळला. मेळाव्यात माजी आमदार अशोक काळे अध्यक्षस्थानी होते. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, द्राक्षबागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक कानडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “भाजप महायुती सरकार हे शेतकरी हिताचे सरकार आहे. शेतकऱ्यांसाठीच हे सरकार कार्यरत आहे. वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास करून विकास निधी आणणे हे सोपे काम नाही. उसाच्या ठिबकसाठी प्रतिटन १०० रुपये अनुदान देऊन समितीने सरकारपुढे एक पाऊल टाकले आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी स्वतः शेतकऱ्यांचा मुलगा असल्याने त्यांच्या व्यथा जाणतो. कृषियांत्रिकी योजनेद्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह अवजारे सवलतीच्या दरात मिळत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ लाख शेतकऱ्यांना सुरुवातीला ८८० कोटी आणि नंतर ६२६ कोटी रुपयांची पिकनुकसान भरपाई दिली. हवामानातील बदल आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. नवे तंत्रज्ञान वापरून शेती करणे गरजेचे आहे.”
कर्जमाफीची तारीख सांगितली
मेळाव्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर बोलताना भरणे यांनी सांगितले की, निवडणूक घोषणापत्रातील आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ही माफी ३० जून २०२६ पर्यंत होईल. त्यापूर्वी एक समिती स्थापन करून एप्रिल २०२६ पर्यंत अहवाल तयार होईल, ज्यावर आधारित अंतिम निर्णय घेतला जाईल. ही तारीख ऐकून उपस्थित शेतकऱ्यांमध्ये निराशा दिसून आली, कारण त्यांना तात्काळ दिलासा अपेक्षित होता. भरणे यांनी मात्र, “अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईची रक्कम १० दिवसांत खात्यांमध्ये जमा होईल,” अशी हमी दिली.


