पुणे : वाघोलीतील उबाळे नगर परिसरात रविवारी (५ ऑक्टोबर) पहाटे धक्कादायक घटना घडली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या बादल शेख (वय २४, रा. खराडी) याचा त्याच्याच तीन साथीदारांनी डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे. ही क्रूर हत्या कृष्णा लॉजसमोर पहाटे सुमारे ३.३० वाजता घडली असून, या घटनेमुळे वाघोली-खराडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास तीव्र केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (४ ऑक्टोबर) रात्री उशिरा खराडी परिसरात बादल शेख आणि त्याचे तीन साथीदार यांच्यात किरकोळ कारणावरून तुंबळ भांडण झाले. हे भांडण इतके तापले की, चौघेही एका दुचाकीवरून वाघोलीतील उबाळे नगरकडे रवाना झाले. कृष्णा लॉजसमोर पोहोचल्यानंतर त्यांनी रूम बुक करण्याबाबत चौकशी केली.
मात्र, त्याचवेळी पुन्हा वाद भडकला आणि इतर तिघांनी बादल शेखवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी प्रथम त्याच्यावर वार केले आणि नंतर जवळील दगड घेऊन डोक्यात जोरदार मारहाण केली. ही मारहाण इतकी प्रचंड होती की, बादल शेख घटनास्थळीच जागीच मृत्यू पावला. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी दुचाकीवरून पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिस तपासात असे धक्कादायक उघडकीस आले की, बादल शेख आणि आरोपी हे सर्वच रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. बादल शेखवर अनेक गुन्ह्यांची नोंद असून, तो स्थानिक गुंडगिरीशी संबंधित होता. आरोपींची नावे अद्याप उघड केलेली नाहीत, पण ते खराडी-वाघोली परिसरातील स्थानिक गुंड असल्याची माहिती आहे.


