पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या परदेशातील पलायनाने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून 11 सप्टेंबरपासून परदेशात फरार असलेल्या घायवळच्या पलायनामागे राजकीय आश्रय असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
रवींद्र धंगेकर यांनी थेट कोथरुडचे आमदार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत, त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या मोबाइल तपासणीची मागणी केली आहे. धंगेकर यांच्या या वक्तव्यानंतर पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, तर पोलिसांनी घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
रवींद्र धंगेकरांचा सनसनाटी दावा
रवींद्र धंगेकर म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या ‘पाटील’ नावाच्या व्यक्तीने घायवळशी संपर्क साधला होता. चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमधील त्या व्यक्तीचा मोबाइल आणि त्याचे सर्व नंबर तपासले पाहिजेत. घायवळने किती वेळा त्याच्याशी संपर्क साधला आणि किती निरोप दादांना दिले, याची माहिती पोलिसांना मिळेल. पण सत्तेमुळे पोलिस काहीच करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, असं धंगेकर यांनी म्हटले आहे.
पुढे म्हटले की, घायवळ एकट्याने असे कृत्य करू शकत नाही आणि त्याला पाठबळ देणाऱ्या राजकीय व्यक्तींचा तपास होणे गरजेचे आहे. या आरोपांनी चंद्रकांत पाटील आणि भाजपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, विरोधकांना नवे राजकीय हत्यार मिळाले आहे.
अखेर पासपोर्ट घोटाळ्याचा उलगडा झाला
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवला होता. त्याने पासपोर्ट अर्जात आपले नाव ‘गायवळ’ असे दाखवले आणि अहमदनगर पोलिसांकडे खोटी कागदपत्रे सादर करून तात्काळ पासपोर्ट प्राप्त केला. विशेष म्हणजे, त्याने अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसल्याचे खोटे सांगितले. कोथरुड गोळीबार प्रकरणात ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाईनंतर घायवळ 11 सप्टेंबरपासून परदेशात फरार आहे. त्याच्या पलायनाने पुणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.


