पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर ४१ प्रभागांमधून तब्बल ५ हजार ८४३ हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. या हरकती आणि सूचनांवर गुरुवार (८ सप्टेंबर) आणि शुक्रवार (दि. १२) असे दोन दिवस महापालिका प्रशासन सुनावणी घेणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहात ही सुनावणी पार पडणार आहे. मात्र, या सुनावणीमध्ये प्रत्येक प्रभागाला केवळ दीड तासाचा वेळ देण्यात आला आहे. यामुळे पालिका प्रशासनाला खरंच सुनावणी घ्यायची आहे? अशी जोरदार चर्चा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी १६५ एवढी सदस्य संख्या निश्चित केली गेली आहे. ४० प्रभाग हे चार सदस्यीय आणि एक प्रभाग पाच सदस्यीय करण्यात आला आहे. तसेच महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमुळे महापालिका प्रशासनाने नव्याने प्रारूप प्रभाग रचना तयार केली आहे. मागील महिन्यात २२ ऑगस्टला राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने प्रभागांची प्रारूप रचना जाहीर करून त्यावर हरकती मागविल्या होत्या. हरकती मागविण्याची मुदत गुरुवारी (४ सप्टेंबरला) दुपारी तीन वाजेपर्यंत होती.हरकती आणि सूचना करण्यासाठी देण्यात आलेल्या वेळात ५ हजार ८४३ हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. यावर आता ११ आणि १२ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.


