ZP Election Result 2026: राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या 8 जागा तसेच पंचायत समितीच्या 16 जागांवर मोठ्या फरकाने मताधिक्य मिळवत विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना धूळ चारत जिल्ह्यात आणि तालुक्यात अजित पवार हेच दादा असल्याचे सिद्व केले आहे.
निवडणूकीच्या प्रचारादरम्यान, अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात ही निवडणूक पार पडली. अजित पवार यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सर्व जाहिर सभा रद्द करण्यात आल्या. घरोघरी प्रचार, घोंगडी बैठकांतून उमेदवारांनी प्रचार केला. याउलट भारतीय जनता पक्षाकडून तालुक्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, दौंडचे आमदार राहुल कुल, माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या जाहिर सभांचे आयोजन करत राजकीय वातावरण तापवले. परंतु तालुक्यातील मतदारांनी विरोधकांच्या प्रचारास साथ दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे मताधिक्य दिले.
दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना एकत्र आणले
राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी काही तालुक्यातील कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, शरद पवार गटाचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना एकत्रित आणून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. अजित पवार यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तालुक्यात भरणे आणि पाटील यांनी एकत्रितरित्या उमेदवार दिले. यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी अधिकच बळकट झाली.
श्रीराज भरणे, यशराज जगदाळे यांचा पहिल्याच प्रयत्नात विजय
त्याचबरोबर बोरी गणातून पहिल्यांदाच निवडणुकीसाठी उभा राहिलेले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे तसेच पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे पुत्र यशराज जगदाळे यांनी पहिल्याच प्रयत्नात वडापुरी-माळवाडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक जिंकली आहे.


