Maharashtra Heatwave : महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट पुन्हा उसळली असून, विशेषतः विदर्भात तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४६.९अंश, तर अमरावतीत ४६.८अंश तापमानाची नोंद झाली आहे.
वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, हवामान विभागाने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. बुलडाणा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
यवतमाळमध्ये तापमान ४६ अंश वर पोहोचले असून, उष्णतेची लाट ३० एप्रिलपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. रात्रीचे तापमानही वाढून ३० अंश वर गेल्याने उकाडा अधिक जाणवत आहे. वाशिममध्ये ४४.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान, उर्वरित राज्यात आंशिक ढगाळ वातावरण असले तरी उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


