Monsoon Update : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अद्याप संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या प्रभावाखाली आलेला नाही. त्यामुळे काही भागांत दमदार पाऊस पडत असताना अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णता आणि दमट वातावरण कायम असल्याचे चित्र आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज राज्यातील 28 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत दिवसभर उष्ण व दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मात्र दुपारनंतर वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी गडगडाटासह हलक्या सरी कोसळू शकतात.
दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरी तसेच पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागांत आणखी प्रगती केली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती तयार होत असून महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.


