Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मान्सून आता पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवसांत राज्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण होणार असून अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या आठवडाभरात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतो.
सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढली आहे. विशेषतः विदर्भात उष्ण लाटेचा प्रभाव जाणवत असून काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर वादळी वाऱ्यांसह पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.
आज अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये उष्ण लाट तसेच वादळी पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यासाठी उष्ण हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, पुणेकरांसाठीही दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन ते चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ढगाळ वातावरणामुळे वाढत्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात पुण्यात कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. मात्र शनिवारी तापमानात सुमारे दोन अंशांची घट नोंदविण्यात आली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दुपारनंतर आणि सायंकाळी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
आजचे हवामान अलर्ट
ऑरेंज अलर्ट (उष्ण लाट आणि वादळी पावसाची शक्यता)
अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
येलो अलर्ट (उष्ण हवामान)
पालघर.
येलो अलर्ट (वादळी पावसाची शक्यता)
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर.
हवामान विभागाने नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्याचे तसेच वादळी पावसादरम्यान सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.


