Maharashtra Weather : राज्यात एकीकडे उन्हाचा तीव्र तडाखा कायम असताना दुसरीकडे काही भागांत पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहणार असून कोकणात उष्ण व दमट हवामानाचा त्रास वाढणार आहे.
आज ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्ण व दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, IMD ने यंदाचा नैऋत्य मान्सून 26 मेपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मान्सूनचे केरळात आगमन हे देशातील पावसाळ्याची अधिकृत सुरुवात मानले जाते. त्यामुळे राज्यातील नागरिकांना उकाड्यापासून लवकरच दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत अकोला, जळगाव, वर्धा आणि अमरावती येथे तापमान 45 अंशांच्या पुढे गेले. नागपुरात 44 अंश, तर धुळे, परभणी, वाशीम आणि यवतमाळ येथे 43 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. त्यामुळे राज्यात सध्या उष्णतेची लाटसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


